आदर्श आचार संहिता काटेकोर पणे अमलबजावणी करा – राजेश देशमुख
*आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख*
पुणे दि.२२: निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार जागृतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.
कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले उपस्थित होते.
कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगून डॉ. देशमुख म्हणाले, त्यासाठी मतदार संघात ठिकठिकाणी मतदार जगृती कार्यक्रमांचे आयोजन करावे. निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी-कर्मचारी यांचे निवडणूक प्रक्रियेबाबत प्रशिक्षण महत्वाचे आहे. त्यातील बारकाव्यांची माहिती घ्यावी. भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी आलेले आदेश तसेच परिपत्रकांचे अवलोकन करावे. कोविड संदर्भात निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, निवडणूक संदर्भातील सर्व कक्षांची तातडीने स्थापना करावी. निवडणूक कालापधीत गंभीर्यपूर्वक काम करावे आणि दैनंदिन अहवाल सादर करावे. निवडणूक कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन करण्यात यावे. दिव्यांग मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही ते यावेळी म्हणाले.
निवडणूक कामकाजाच्या अनुषंगाने नेमणूक करण्यात आलेल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी घेतला.
000