खेड आळंदी विधानसभा निवडणूक मतमोजणीच्या अनुषंगाने वाहतुकीत बदलाचे आदेश जारी
आळंदी दि. २२: खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी राजगुरूनगरच्या तिन्हेवाडी रोड येथील क्रीडा संकुलात २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी परिसरात विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित राहणार असल्याने २३ नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे ५ वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या परिसरात वाहतुकीत बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास देशमुख यांनी जारी केले आहेत.
या आदेशान्वये शासकीय विश्रामगृह ते तिन्हेवाडी रस्ता ते सांडभोरवाडी रस्त्यावरील व वाळुंजस्थळ ते तिन्हेवाडी ते सांडभोरवाडी रस्त्यावरील सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. सांडभोरवाडी व तिन्हेवाडीकडे पुणे नाशिक महामार्गावरून सांडभोरवाडी फाटा या पर्यायी मार्गाने सर्व वाहनांना सोडण्यात येईल.
मार्केट यार्ड, मार्केटयार्ड रस्ता परिसर व शासकीय केनॉल विश्रामगृह येथील पार्किंग भाजप महायुती उमेदवार यांचे कार्यकर्ते यांना थांबविण्यासाठी व पार्किंग म्हणून राखीव ठेवणेत येत आहे. तर महात्मा गांधी विद्यालय परिसर, पीएमटी बस स्थानक समोरील मोकळी जागा येथे महाविकास आघाडी उमेदवार यांचे कार्यकर्ते यांना थांबविण्यासाठी व पार्किंग म्हणून राखीव ठेवण्यात येत आहे.
अत्यावश्यक सेवेतील पोलीसांची, अग्निशामक, ॲम्ब्युलन्स तसेच निवडणूक प्रक्रियेत समाविष्ठ असलेल्या सर्व प्रकारच्या वाहनांना वगळून आवश्यकतेनुसार २३ नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे ५ वाजेपासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अथवा मतमोजणी पूर्ण होईपर्यंत प्रवेश बंदी करण्यात येत आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.