MAHARASHTRA

पत्रकार हल्ला संबंधी कायद्याची प्रभावी अमोल बजावणीसाठी शासन सकारात्मक -पालकमंत्री

पुणे (महेश कुलकर्णी)

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीस सदिच्छा भेट

पुणे, दि.१: पत्रकार हल्ल्यासंबंधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन सकारात्मक असून त्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनाही या कायद्याबाबत माहिती देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे सुरु असलेल्या राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीस पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, डॉ. राहुल तिडके, किशोर गांगुर्डे, विभागीय उपसंचालक व समितीचे सदस्य उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, पत्रकार समाजाचे प्रतिनिधित्व करताना राजकीय शक्तीवर अंकुश ठेवण्याचे काम करतात. समाजाला दिशा दाखविण्याचे आणि समाजाचे प्रश्न मांडण्याचे महत्वाचे काम माध्यमाद्वारे होते. पत्रकारांना आरोग्य सुविधा व घरे देण्यासाठीही शासन प्रयत्नशील आहे.

यावेळी राज्य समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांनी राज्य अधिस्वीकृती समितीची रचना, व कामकाजाबाबत माहिती दिली.

राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

तत्पूर्वी पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे आयोजित राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीचे उद्घाटन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

माजी राज्यमंत्री श्री.पाटील म्हणाले, राज्यात तालुकास्तरावरील पत्रकारांची संख्या वाढते आहे. तालुकास्तरावरील पत्रकारांसाठी पत्रकार भवन असणे आवश्यक आहे. जिल्हा नियोजन समितीचे पत्रकार भवन बांधण्यासाठी सहकार्य घेता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, माहिती व जनसंपर्क महाराष्ट्राचा कणा आहे. सांस्कृतिक विभाग व माहिती व जनसंपर्क विभाग महाराष्ट्राचे भूषण आहे. पत्रकारांवर खूप महत्त्वाची जबाबदारी आहे. समितीने बदलत्या परिस्थितीचा अभ्यास करावा. पत्रकारांसाठी विभागीय चर्चासत्रे आयोजित करावीत, असे सांगितले.

राज्य समितीचे अध्यक्ष श्री. जोशी म्हणाले, समितीमध्ये सर्व प्रसिद्धी माध्यमांमध्ये काम करणारे पत्रकार आहेत. माध्यम क्षेत्राच्या विकासासाठी व अशा अभ्यासक्रमासाठी समिती सदस्य सहकार्य करतील, असेही ते म्हणाले.

यावेळी माजी मंत्री श्री.पाटील, पुणे विभागाचे उपसंचालक डॉ.पुरुषोत्तम पाटोदकर आणि पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पटणे यांनी बैठकीस उपस्थित सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. बैठकीस नवी मुंबई, पुणे, नाशिक, लातूर, अमरावती, नागपूर, कोल्हापूर विभागाचे उपसंचालक व समितीचे सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button